मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:29 AM2023-08-14T11:29:45+5:302023-08-14T11:30:03+5:30
मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही
बारामती : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक रुग्णालयात हि घटना घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्यात अशी घटना घडली असेल. तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, याचा हा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी ठाणे येथील घटनेबाबत चिंता व्यक्त करीत शासनावर टीका केली. पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. भाजपचा सत्तेचा गैरवापर करुन हि पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या, त्यानंतर ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न करण्याची भुमिका जयंत पाटील यांच्याबाबत दिसुन येत आहे. मात्र,जयंत पाटील विचारांच्याबाबत स्पष्ट आहेत, याची मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.
मणिपुरकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. संसदेत आम्ही याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. मणिपुरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी सक्तीची भुमिका घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या दोन अडीच तासांच्या भाषणात या भुमिकेचा अभाव होता. मणिपुरमधील सध्याच्या अवस्थेला काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही. ९ वर्षांपासुन भाजपकडे तेथील सत्ता आहे. समजा काँग्रेसने काम चांगले केले नसल्याने तेथील लोकांनी भाजपला संधी दिली. नऊ वर्षापासुन भाजपची तेथे सत्ता आहे. नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले, अशी टिका पवार यांनी केली.