Maharashtra Rain Update: आता विश्रांती संपली...! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुण्यात मात्र हलक्या सारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:37 PM2024-07-12T13:37:57+5:302024-07-12T13:39:09+5:30
रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; पण आता शुक्रवारपासून (दि.१२) पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारपासून (दि.१२) रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतदेखील बहुतांश भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी (दि.१३) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. तसेच रविवारी आणि सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १३ ते १५ जुलैदरम्यान काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. विदर्भामध्ये १३ जुलै रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात हलक्या सरी
पुणे शहरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी मात्र हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. पुढील दाेन दिवस पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील पाऊस
पुणे : ०.७ मिमी
कोल्हापूर : २ मिमी
महाबळेश्वर : ४ मिमी
सातारा : ०.५ मिमी
मुंबई : २९ मिमी
अलिबाग : ७ मिमी
चंद्रपूर : ३७ मिमी
गोंदिया : १४ मिमी