विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! महाविद्यालयातून द्या, कराटे प्रशिक्षण, विद्यापीठांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:57 PM2024-09-06T12:57:49+5:302024-09-06T12:58:28+5:30
राज्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे
पुणे : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतशिक्षण घेणाऱ्या मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुली शैक्षणिक अभ्यासासाेबतच शारीरिकदृष्ट्या सक्षम हाेण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे गिरविणार आहेत. उच्च शिक्षण संचालकांनी मुलींसाठी किमान एकदा तीन महिने कालावधीचा कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, अशी सूचना शिक्षण संस्थांना करावी, असे आदेश राज्यातील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक आणि अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत.
राज्याचे महिला धोरण- २०१४ मधील मुद्दा क्र. ६.१३ नुसार ‘सर्व शिक्षण संस्थांनी मुलींसाठी तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम किमान एकदा राबवावा’ असे नमूद केले आहे. राज्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिला धाेरणानुसार महाविद्यालयीन आणि शालेय मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग तत्काळ सुरू करावेत, अशी मागणी दीपू फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालयाकडे करण्यात आली हाेती. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाचे संचालकांनी गुरुवार दि. ५ राेजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या सर्व विभागीय सहसंचालक आणि अकृषी, अभिमत, स्वयं अर्थसाहाय्यित विद्यापीठांच्या कुलसचिवांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना तीन महिने कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, अशी तातडीने सूचना द्यावी, असे नमूद केले आहे.
विभागीय सहसंचालक कार्यालय तसेच विद्यापीठांनी सूचना दिल्यानंतर महाविद्यालयांनी केलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गांचा अहवाल संकलित करून एकत्रित स्वरूपात उच्च शिक्षण संचालनालयास सादर करावा लागणार आहे. ज्या महाविद्यालयांनी निर्देशानुसार कार्यवाही केली नाही, त्यांच्यावर काय कारवाई केली, याचाही अहवालही सादर करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
विद्यापीठांनी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियाेजन करावे. तसेच संलग्न महाविद्यालयांत हा संवेदनशील उपक्रम राबविण्यासाठी गांभीर्याने काम करावे. सर्व विद्यापीठांकडून यासंदर्भात आढावा घेणार आहाेत. - डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण