Pune Temperature: जाम उकडतंय...! पुणेकरांना फुटला घाम, तापमानाचा पारा चाळीशी पार
By श्रीकिशन काळे | Published: May 11, 2023 05:27 PM2023-05-11T17:27:53+5:302023-05-11T17:28:09+5:30
पूर्वी शहराचे तापमान ४० अंशांच्या आतच नोंदविले जात होते,पण आता हा शिक्का कधीच पुसला गेला
पुणे : शहरातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. संपूर्ण पुण्यातील सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअसवर गेले आहे. तर सर्वाधिक तापमानाची नोंद कोरेगाव पार्क येथे ४२.८ नोंदली गेली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस पुणेकर उष्णतेमुळे घामेघूम होणार आहेत. हवामान कोरडे राहणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पुण्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी शहराचे तापमान ४० अंशांच्या आतच नोंदविले जात होते. पुणे हे खऱ्या अर्थाने हिल स्टेशन समजले जात होते. पण आता हा शिक्का कधीच पुसला गेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे थंड राहिले नसून, ते चांगलेच तापू लागले आहे. यंदा तर हवामानात प्रचंड चढ-उतार पहायला मिळत असून, उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. सध्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, किमान तापमानही वाढले आहे. कमाल तापमानाचा पारा ४०-४२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर किमान तापमान सर्वाधिक २७ नोंदले गेले. त्यामुळे रात्री देखील गरमीने पुणेकर हैराण झाले आहेत.
पुण्याचे किमान व कमाल तापमान
वडगावशेरी २७.७ ४२.२
कोरेगाव पार्क २६.३ ४२.८
हडपसर २४.८ ४१.८
शिवाजीनगर २२.७ ४०.१
एनडीए २२.१ ३९.४
पाषाण २०.९ ४०.१
हवेली २०.६ ३८.३
सध्या तापमानाचा पारा वाढलेला असून, येत्या ७२ तासांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कदाचित वर्षभरातील हे तापमान सर्वाधिक नोंदले जाण्याची शक्यता आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग
मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्याचे मोखा चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. परंतु, त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता नाही. चक्रीवादळामुळे राज्यात हवामान कोरडे राहील. कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. १२ ते १७ मे पर्यंत पुण्यात आकाश निरभ्र राहील.