शरद पवारांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला अन् उलगडले त्यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:07 PM2022-12-11T14:07:04+5:302022-12-11T14:07:22+5:30
विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले
पुणे : महाविद्यालयीन काळातील मजेदार गंमती, विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले. निमित्त होते, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शारदोत्सवात 'मैत्र जीवांचे'- शरद पवार यांच्याबरोबरच्या अतुट मैत्रीचे अनोखे किस्से या कार्यक्रमाचे.
माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील, उद्योगपती विठ्ठल मणियार, संभाजी पाटील (कर्नल), मधुकर भावे आणि बारामतीचे जवाहर वाघोलीकर यांनी यात मैत्रीला उजाळा दिला.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, कॉलेज जीवनापासून शरद पवार यांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला. पवार यांच्या नेतृृत्वाची चुणूक ते बीएमसीसीमध्ये असतानाच आम्हा मित्रमंडळींना आली होती. १९६१ साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी शरद पवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपण काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून निषेध मोर्चा काढला.
५ ते ६ हजार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा निषेध मोर्चा शनिवार वाडा येथे झालेल्या समारोपप्रसंगी पंचवीस हजारांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्या निषेध सभेत पवार यांचे भाषण ऐकून बॅरिस्टर गाडगीळ यांनी महाराष्ट्र पवार यांच्या हातात सुजलाम्, सुफलाम् आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला. वेदनेचे संवेदनेत रूपांतर करणारा आणि सामाजिक भान बाळगणारा मित्र हा आमचा नेता आहे.
जवाहर वाघोलीकर म्हणाले की, पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी मी त्यांच्या सोबत होतो. मतदारांच्या स्लीपा लिहिण्यापासून रात्री-बेरात्री खेडीपाडी पिंजून काढून आम्ही प्रचार केला आणि त्यांना निवडून आणले.
कर्नल संभाजी पाटील म्हणाले की, शरद पवार हे माणुसकी आणि मैत्री जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिस्त हा गुण इतर गुणांचे अधिष्ठान आहे. सैनिकांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या अनेक अडचणी त्यांनी चुटकीसरशी सोडवल्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
विठ्ठल मणियार म्हणाले की, विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक मी पवार यांच्या विरोधात लढलो होतो आणि मी ती हारलो होतो. त्यांच्या विरोधात लढून हारण्यात देखील मजा असते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्या निवडणुकीपासून मी त्यांच्याच गोटातला झालो.