एकतर्फी प्रेमातून अठरा वर्षांच्या मुलाने केले शाळकरी मुलीचे अपहरण; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:54 PM2022-07-08T18:54:34+5:302022-07-08T18:55:02+5:30
माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकीही त्याने दिली...
पुणे : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचे अपहरण करून स्वत:च्या घरात डांबून ठेवण्याचा प्रकार घडला. माझ्याशी लग्न केले नाही, तर तुझ्या कुटुंबीयांना मारून टाकू, अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी हडपसर येथील एका अठरा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अल्पवयीन मुलीवर एका मुलाचे एकतर्फी प्रेम आहे. तो तिचा पाठलाग करून त्रास देत होता. महिनाभरापूर्वी मुलीला शाळेजवळ अडवून माझ्याशी लग्न केले नाही, तर आई-वडिलांना मारून टाकेन. माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकीही त्याने दिली होती.
त्यानंतर, मुलगी घरात एकटी असताना ताे घरात शिरून मुलीला धमकावून घरातून बाहेर नेले. त्याने तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. त्याने तिला लग्न करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.