Alphonso Mango: फळांचा राजा आला ओ...! मार्केटयार्डात आंबा खरेदीसाठी लगबग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:37 AM2023-03-20T10:37:51+5:302023-03-20T10:38:01+5:30
सध्या आंबा ४ ते ६ डझन आंब्याची पेटीला ४ ते ५ हजार रुपये भाव
पुणे : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, गुढीपाडव्यानिमित्त मार्केट यार्डात आंबा खरेदीसाठी लगबग सुरू आहे. पुणे बाजार समितीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून कच्चा हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. तयार आंबा खरेदीसाठी रविवारी नागरिकांनी गर्दी केली होती. यावर्षी आंब्याच्या हंगामावर पहिल्या टप्प्यात पावसाचे सावट होते. पावसामुळे काही प्रमाणात आंब्याचे नुकसानही झाले होते. मात्र, तरीही पहिल्या टप्प्यात ग्राहकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सध्या आंबा ४ ते ६ डझन आंब्याची पेटीला ४ ते ५ हजार रुपये भाव आहे, तर एक डझन ९०० ते १२०० रुपये भावाने विक्री केली जात आहे. यावेळी पांडुरंग सुपेकर म्हणाले की, गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सकाळपासून ग्राहकांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली होती. गुढीपाढव्यापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत आंब्याला मागणी असते. बदलत्या हवामानामुळे अक्षय तृतीयेपर्यंत किती आंबा उपलब्ध राहील याबाबत साशंकता आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.