प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:50 PM2022-01-27T16:50:11+5:302022-01-27T16:51:39+5:30
सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित असून व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुणे: उपेक्षितांच्या आगतिक आयुष्याची ओळख करून देणा-या विविधांगी विषयांवर लेखन करणारे प्रतिभावंत लेखक, ओरिगामी, लाकडातील शिल्पकाम, फोटोग्राफी, चित्रकला, बासरी आदी कलाप्रांतात लीलया भ्रमंती करणारे अष्टपैलू कलावंत आणि व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे लढा देणारे ‘मुक्तांगण’ चे संस्थापक डॉ. अनिल अवचट (वय 77) यांचे निवासस्थानी गुरूवारी निधन झाले.
सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित होते. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अवचट यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते. मात्र, गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कन्या मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर, जावई, नातवंडे तसेच मित्रमंडळी असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पत्रकार नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
अल्प परिचय
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस ची पदवी घेतल्यानंतर त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. बिहार मधील अनुभवांवरील सामाजिक लेखांचा समावेश असलेलं 'पूर्णिया' हे त्यांचं पहिलं पुस्तक 1969 साली राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर डॉ. अवचट यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले.
'कोंडमारा' हा दलित अत्याचारांवरील सामाजिक लेखांचा त्यांचा संग्रह विशेष गाजला, तर 'माणसं' या पुस्तकाव्दारे त्यांनी हमाल, विडीकामगार, वैदू यांच्या सामाजिक जीवनाचा लेखाजोखा मांडला. 'कार्यरत', 'छंदांविषयी', 'स्वत:विषयी', 'गर्द', 'पुण्याची अपूर्वाई', 'सृष्टीतगोष्टीत' आणि 'सुनंदाला आठवतांना' ही त्यांची पुस्तकंही विशेष गाजली. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारासह प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 2021 चा ‘‘जीवनगौरव पुरस्कार' तर सृष्टीत.. गोष्टीत या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या अकस्मिक निधनाने सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.