पुण्यात आज रंगणार 'लोकमत सखी डॉट कॉम' पुरस्कार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 09:36 IST2023-02-01T08:48:26+5:302023-02-01T09:36:31+5:30
पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगणार सोहळा...

पुण्यात आज रंगणार 'लोकमत सखी डॉट कॉम' पुरस्कार सोहळा
पुणे : चाकोरी मोडून आपण निवडलेल्या वाटेवर चालणे कधीच सोपे नसते. पायाखालची मळलेली वाट नाकारायची तर आत्मविश्वास आणि आशावाद हवा. हेच सारे सोबत घेऊन आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान 'लोकमत सखी डॉट कॉम' करणार आहे. पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये १ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
बँकर ते सिंगर असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस, मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा आणि ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या संचालक आणि प्रथितयश उद्योजिका उषा काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २० यशस्विनींचा यात गौरव करण्यात येणार आहे. कोहिनूर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, लोकमान्य सोसायटी सहयोगी प्रायोजक आहे.
महिलांसाठीची मराठीतील पहिली वेबसाइट आणि कम्युनिटी ही 'लोकमत सखी डॉट कॉम'ची ओळख आहेच; त्यासोबत महाराष्ट्रातीलच नव्हे; तर जगभर पसरलेल्या मराठी महिलांसाठी ते हक्काचे व्यासपीठ आहे. टिपिकल चाकोरी सोडून नवी वाट चालण्याची उमेद देणारी ही खास कम्युनिटी. म्हणूनच ज्यांनी अशी वेगळी वाट हिमतीने निवडली आणि सगळी आव्हानं पेलत यशाचं शिखर सर केलं, अशा महिलांचा, नारीशक्तिचा सन्मान करायचं 'लोकमत सखी डॉट कॉम'नं ठरवलं.
राजकारण, समाजकारण ते कायदा, शेती, फॅशन आणि मनोरंजन यांसह विविध क्षेत्रातील महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या यशस्विनींची 'सक्सेस स्टोरी' अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. आपल्या वाटेत आलेले अडथळे आणि ते पार करण्यासाठी घेतलेली मेहनत याची गोष्ट काही यशस्विनी या सोहळ्यात शेअर करणार आहेत.