टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष; सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक
By नम्रता फडणीस | Published: July 2, 2024 05:52 PM2024-07-02T17:52:39+5:302024-07-02T17:53:41+5:30
सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला सांगितले
पुणे : टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा फंडा सुरूच आहे. शहरात दोघांची १६ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५० वर्षाच्या व्यक्तीची ४ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक सायबर चोरट्याने ५० वर्षाच्या व्यक्तीला व्हॉटस अप क्रमांक पाठवून ऑनलाईन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे कमविण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानुसार त्यांच्याकडून विविध बँक खात्यावर ४ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ जानेवारी ते १० जानेवारीच्या दरम्यान घडली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बागवे करत आहेत.
महिलेची १२ लाखांची फसवणूक टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने विमाननगर येथील महिलेची १२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना ४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्याने फिर्यादी
महिलेशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात १२ लाख पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार करत आहेत.