Pune Crime | पैसे डबल करून देण्याचे आमिष; दौंडमध्ये महिलेची ३५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 03:26 PM2023-03-11T15:26:55+5:302023-03-11T15:30:02+5:30
सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, अशी एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक...
दौंड (पुणे) : येथे एका महिलेला डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, अशी एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोजेस उजागरे (रा. गजानन सोसायटी, दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधा साळवे (रा. गजानन सोसायटी दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
दि. ३ ऑगस्ट २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने १५ लाख ४८ हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. दरम्यान, आरोपीने फिर्यादीकडे पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने पैसे देण्याचे बंद केले. परिणामी, दिलेली रक्कम परत द्यावी म्हणून मोजेसकडे तगादा लावला. तेव्हा मोजेस फिर्यादीने मला अजून पैसे दिले नाही तर आहे ते पैसे देखील तुम्हाला मिळणार नाहीत. तसेच तुमच्याकडील सोन्याचे दागिने द्या, ते मी गहाण ठेवतो आणि तुम्हाला सर्व पैसे आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार संबंधित महिलेने मोजेला ३९ तोळे सोन्याचे दागिने दिले. मात्र, रोख रक्कम आणि दागिने अद्याप परत मिळाले नसल्याने संबंधित महिलेने पोलिसात फसवणुकीची तक्रार केली.