मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:07 PM2024-09-18T18:07:21+5:302024-09-18T18:08:58+5:30

विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, भंडारा उधळण अशा जल्लोषमय मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप

The magnificent procession of shrimant Bhausaheb Rangari from Mayur Pankhi Rath visarjan to Bappa amid the sound of drums | मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

पुणे : सोनेरी मयुरपंखी रथाला गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट आणि  त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि भंडारा उधळत काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
        
मंगळवारी सकाळी अनंत चतुर्थीला आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते रंगारी बाप्पाची पुजा व आरती झाली. त्यांनतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाड्यातून मयुरपंखी रथातून बाप्पा महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. याठिकाणी प्रथा परंपरेनुसार टिळकांच्या  पुतळ्याला आणि मानाच्या पाच गणपतींना 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक रथाला ओढणाऱ्या बैलांना होणारा त्रास लक्षात घेऊन  उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी रथासाठी बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला होता. 132 वर्षांनंतर पहिल्यांदाच स्वतंत्र  रथ तयार करण्यात आला होता. सोनेरी आकर्षक असे मयुरपंखी रथ मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता. उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या रथाचे सारथ्य केले. साधारण पहाटे सव्वा तीनच्या सुमारास प्रत्यक्ष मिरवणुकिला सुरवात झाली.  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगरा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ मर्दानी खेळांच्या पथकाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर समर्थ, शिवमुद्रा आणि श्रीराम पथक यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाराची उधळण केली जात होती. तर मिरवणूक मार्गावरील गणेश भक्तांकडून फुलांची उधळण केली जात होती. तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. सकाळी साडेसात वाजता टिळक चौकात मयूरपंखी रथ आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सकाळी साडे आठच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. कमीत कमी वेळेत ही मिरवणूक संपविण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संपूर्ण उत्सवात पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार! - पुनीत बालन (विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट)

Web Title: The magnificent procession of shrimant Bhausaheb Rangari from Mayur Pankhi Rath visarjan to Bappa amid the sound of drums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.