Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील 2 दिवसांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:44 AM2022-05-20T08:44:13+5:302022-05-20T08:44:22+5:30
पुणे : येत्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज ...
पुणे : येत्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच उत्तर तमिळनाडूच्या अंतर्गत तसेच त्या सभोवतीच्या भागात असलेल्या चक्रवाताची स्थिती कायम आहे. परिणामी गेल्या चोवीस तासांत कर्नाटकची किनारपट्टी, अंतर्गत कर्नाटक व केरळ काही ठिकाणी मुसळधार व तमिळनाडूत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला.
राज्यातही पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच कोकणात शुक्रवारी (दि. २०) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, बुधवारच्या तुलनेत कमाल तापमान सारखेच म्हणजे ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस इतके होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला व वाशिम येथे ४२.५ इतके नोंदविण्यात आले.