Bopdev Ghat Case: बाेपदेव घाट बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २२ ऑक्टाेबरपर्यंत पोलीस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:46 IST2024-10-16T18:44:50+5:302024-10-16T18:46:12+5:30
गुन्हा घडल्यापासून आरोपी कोठे वास्तव्यास होता, त्याला इतर कुणी साहाय्य केले का? त्याचा पोलिस तपास करणार

Bopdev Ghat Case: बाेपदेव घाट बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २२ ऑक्टाेबरपर्यंत पोलीस काेठडी
पुणे: बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील फरारी मुख्य आराेपीला नुकतीच अटक झाली आहे. फरारी काळात तो कोठे वास्तव्यास होता, त्याला इतर कुणी साहाय्य केले, त्यांचे आणखी कुणी साथीदार आहेत का? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी आरोपीला दि. २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर मंतरवाडीजवळ, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत घाटातील टेबल पॉइंट येथे फिरायला आली होती. त्यावेळी आरोपींनी कोयता, लाकडी बांबू, चाकूचा धाक दाखवून पीडिता व तिच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करून तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट असलेली साखळी व चांदीच्या अंगठ्या काढून ते पसार झाले होते. पुणे पोलिसांनी आरोपीला प्रयागराज जिल्ह्यातून (उत्तर प्रदेश) ताब्यात घेतले आणि त्याला बुधवारी (दि. १६) वानवडी येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख याच्याकडून गुन्हा करण्याकरिता वापरण्यात आलेला कोयता, वापरण्यात आलेले वाहन जप्त करायचे आहे. पीडितेच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट असलेली साखळी व चांदीच्या अंगठ्या या दागिन्यांबाबत तपास करून ते जप्त करायचे आहेत. आरोपीची वैद्यकीय चाचणी करायची आहे. तसेच आरोपी याने त्याच्या इतर साथीदारांसह मिळून कसा गुन्हा केला आहे? याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक युवराज हांडे व सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.