मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 08:22 PM2024-02-29T20:22:00+5:302024-02-29T20:22:20+5:30
सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, अलंकार, चतूर्शृंगी, रावेत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण आठ गुन्हे तपासात उघड
धायरी: पुणे व पिंपरी चिंचवड भागात निर्जनस्थळी एकट्या रस्त्याने जात असणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून, मंगळसूत्र खेचून जबरी चोरी करणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून तब्बल आठ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुमित गोविंद इंगळे (वय: २८ वर्षे, मूळ रा. :बार्शी, सोलापूर, सध्या रा. मारुंजी, हिंजवडी) असे त्या सराईत चोरट्याचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे शहर परिसरात दाखल असणा-या चैन स्नेचिंगच्या गुन्हयांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम व अंमलदार आदींनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती जमा केली. हद्दीतील तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून तोडून नेणारा आरोपी हा वडगाव बुद्रुक भागात येणार असल्याबाबत गुप्त खबऱ्यामार्फत माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे, राजू वेंगरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच ही माहिती वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून त्याला वडगाव बुद्रुक येथील प्रयेजा सिटी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, अलंकार, चतूर्शृंगी, रावेत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण आठ गुन्हे तपासात उघड झाले असून त्याच्याकडून एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचे साडेपंधरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारू, राजू वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, अक्षय जाधव, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली.