मेडिकल चालकाने डॉक्टरांना लावली पैशांची चटक! ससूनमध्ये थेट सांगतात...बाहेरून औषधे आणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:43 AM2024-06-13T10:43:22+5:302024-06-13T10:43:27+5:30
Sassoon Hospital News: शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर बाहेरून साहित्य आणल्याचे सांगत नातेवाइकांच्या हातात खासगी बिल टेकवायचे आणि जवळच असलेल्या खासगी मेडिकलकडे भरायला सांगायचे. त्यातून ‘टक्के’वारीचे गणित जुळवत महिन्याला लाखाे रुपये कमावण्याचा प्रकार ससूनमध्ये तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.
पुणे - शस्त्रक्रिया ठरली तर पेशंट व नातेवाइकांना सांगायचे की रुग्णालयात सर्वच मेडिकल, साहित्य मिळत नाहीत. काही बाहेरून विकत घ्यावे लागते. शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर बाहेरून साहित्य आणल्याचे सांगत नातेवाइकांच्या हातात खासगी बिल टेकवायचे आणि जवळच असलेल्या खासगी मेडिकलकडे भरायला सांगायचे. त्यातून ‘टक्के’वारीचे गणित जुळवत महिन्याला लाखाे रुपये कमावण्याचा प्रकार ससूनमध्ये तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.
व्हिडीओनंतर पर्दाफाश
- ससून रुग्णालयातील न्यूराेसर्जरी विभागातील निवासी डाॅक्टरने रुग्णांच्या नातेवाइकांकडे साडेचाेवीस हजार रुपये मागितल्याचा व्हिडीओ समाेर आला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
- ससून रुग्णालयापासून जवळच असलेल्या जसपाल नावाच्या खासगी मेडिकल चालकाने येथे अशा प्रकारे पैसे कमावण्याचा जम बसवला आहे.
- त्याच्या धंद्यासाठी त्याने निवासी डाॅक्टरांना हाताशी धरत, त्यांना टक्केवारीचे आमिष दाखवत रुग्णांकडून पैसे कमावण्याचा धंदा जाेरात सुरू केला आहे. काही डाॅक्टर त्याला बळी पडत आहेत.
दिवसाला लाखाेंची माया
ससून रुग्णालयात १४ ते १५ ऑपरेशन थिएटर आहेत. येथे दरराेज लहान माेठ्या अशा ७० ते ८० शस्त्रक्रिया हाेतात. ऑर्थाे, न्यूराे, सर्जरी विभागातील निवासी डाॅक्टरांना हाताशी धरून या खासगी मेडिकल चालकाने त्याचे चांगलेच बस्तान बसवले आहे. किमान निम्म्या शस्त्रक्रियेसाठी पाच-पाच हजार असे पकडले तरी त्याची बेरीज ही लाखाेंच्या पुढे जाते.
डिलिव्हरी बॉय
या खासगी मेडिकल चालकाकडे ससूनमधील डॉक्टरांनी यादी पाठवण्यापूर्वी याची कल्पना रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना देण्यात येते.
यादी या मेडीकल चालकाकडे व्हॉटस्ॲपवर पाठवली जाते. त्यानंतर डिलिव्हरी बॉय तत्काळ औषधे आणून देतो. त्यानंतर रुग्णाला ऑनलाइन पेमेंट करायला सांगितले जाते.असे अनेक डिलिव्हरी बॉय कामाला आहेत.
या प्रकरणाची चाैकशी करण्यात येत आहे. संबंधित पैसे मागणारा डाॅक्टर न्यूराेसर्जरी विभागातील कनिष्ठ निवासी डाॅक्टर आहे. दाेन ते चार दिवसांत चाैकशी पूर्ण हाेईल व त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.
-चाैकशी समितीमधील एक वरिष्ठ डाॅक्टर