भोर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:25 PM2022-03-08T20:25:49+5:302022-03-08T20:48:14+5:30
सोनोग्राफी सेंटरचा प्रतिकुल शेरा न पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भोर येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाला रंगेहाथ पकडले
पुणे : सोनोग्राफी सेंटरचा प्रतिकुल शेरा न पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करुन ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भोर येथील उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाला रंगेहाथ पकडले. डॉ. अमित हिंदुराव सरदेसाई (वय ६०, रा. भोर) असे या वैद्यकीय अधीक्षकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करुन त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठवायचा असतो. भोरमधील तक्रारदार डॉक्टर यांचे हॉस्पिटल आहे. त्यात सोनोग्राफी सेंटर आहे. या सेंटरची तपासणी करुन अनियमितता आढळल्यास जिल्हा शक्य चिकित्सक यांच्याकडे प्रतिकुल शेरा/अहवाल न पाठविण्यासाठी डॉ. अमित सरदेसाई याने १० हजार रुपयांची लाच मागितली. डॉक्टरांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी केली असताना त्यांनी तडजोडी अंती ५ हजार रुपये स्वाकारण्याचे मान्य केले. त्यानुसार डॉक्टरांकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून डॉ. सरदेसाई याला पकडले. भोर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.