मीटरने नको म्हणतोय पुण्यातील रिक्षावाला! एक किलोमीटरसाठी तब्बल ६० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:35 PM2023-10-14T13:35:38+5:302023-10-14T13:36:13+5:30
ठरवून घेतात भाडे : किंवा मग ओला, उबर...
पुणे : शहरांतर्गत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला पीएमपीएमएलचा मोठा आधार आहे, आता मेट्रोची त्यात भर पडली आहे, मात्र तरीही शहरात जिथे पीएमपीएल जात नाही व मेट्रोही जात नाही तिथे प्रवास करण्यासाठी अजूनही रिक्षाचाच सर्वाधिक वापर होत आहे, मात्र, अशा प्रवासासाठी यापूर्वी मीटरप्रमाणे भाडे घेणारे रिक्षाचालक सध्या मीटरला हात लावायलाही तयार नाही. भाडे ठरवून घेण्याचा जुनाच फंडा त्यांनी सुरू केला आहे. तसे नाही तर मग ओला उबेर या कंपन्यांच्या रिक्षा मोबाईलवर बुक करून बोलवा असे त्यांचे म्हणणे असते.
शहरातील अनेक रिक्षाचालक स्वत: होऊनच या कंपन्यांबरोबर संलग्न झाले आहे. या कंपन्यांचे ॲप वापरले की त्यांनी ते जिथे असतील त्याच्या आसपास जाण्यासाठी कंपनीकडूनच कळविले जाते. प्रवासी कंपन्यांबरोबर मोबाईलवरून तो जिथे असेल तिथून रिक्षा बुक करतो. हा व्यवहार हल्ली सर्रास झाला आहे. यात कंपनीने भाडे आधीच ठरवून दिलेले असते. ते रिक्षापेक्षा जास्त असले तरी प्रवाशांना जागेवर रिक्षा मिळत असल्याने अनेक प्रवाशांकडून यालाच पसंती मिळत आहे. त्यामुळेच आता या कंपन्यांबरोबर संलग्न नसलेले साधे, नेहमीचे रिक्षाचालकही मीटर वापरण्याऐवजी भाडे ठरवून घेण्यासाठी आग्रही असतात.
यातून, मी फक्त ओला, उबेर साठी काम करतो, हवी तर दुसरी रिक्षा करा, मला कॉल येणार आहे, अशी दुरुत्तरे प्रवाशांना दिली जातात. थांब्यांवर जाऊन रिक्षा करणाऱ्या वृद्ध प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. प्रवाशांबरोबर वाद घातले जातात. आरटीओच्या नियमानुसार रिक्षाचालकांनी प्रवाशांना नकार देऊ नये, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत, मला यायचे नाही, इतक्या जवळ जमणार नाही, मीटर सुरू करणार नाही असे सांगत रिक्षाचालक प्रवाशांवर दादागिरीही करू लागले आहेत.
लांबचा प्रवास असेल तर बस किंवा मेट्रोचा वापर केला जातो, मात्र शहरातील पेठांमध्ये अतंर्गत भागात कुठे जायचे असेल तर सध्या तरी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. याचाच गैरफायदा रिक्षाचालकांकडून घेतला जात आहे. त्यातही जवळचे अंतर असेल तर रिक्षाचालक कितीही आग्रह केला तरी येतच नाहीत. रात्रीच्या वेळी असे प्रकार फार होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
बसचालकांनाही त्रास
रिक्षाचे अनेक थांबे बसस्थानकांजवळच आहेत. थांब्यावर रिक्षांची रांग लागलेली असते. बसला स्थानकावर जाताना त्रास होतो. मात्र, रिक्षाचालक बाजूला होत नाहीत. स्थानकात उभे असलेल्या किंवा स्थानकात जाऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो.
बसस्थानकापासून माझ्या घराचे अंतर १.५ किमी आहे. मला रिक्षा मिळते, परंतु, अंतराच्या तुलनेत जास्त पैसे मागितले जातात किंवा मीटरने येण्यास नकार दिला जातो. अनेकदा ओला, उबर ॲप वरूनही रिक्वेस्ट घेतली जात नाही. यामुळे मला पायी चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
- संदेश राठोड, प्रवासी .
ॲप सोबत काम केल्यामुळे थेट खात्यात पैसे येतात. भाड्यासाठी घासाघीस करावी लागतं नाही. बऱ्याचदा प्रवासी भाडे एक ठरवितात आणि देतात त्यापेक्षा कमी. यामुळे नुकसान होते. सोबतच मीटरने येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वाट बघावी लागते त्यामुळे आम्हाला ऑनलाईन ॲपसाठी काम करणे आवडते.
- नीतेश, रिक्षाचालक.