मॉडेरेटरने लस्सी पिण्यासाठी घेऊन गेल्यावर प्राध्यापिकेला मारली मिठी; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 02:35 PM2022-04-05T14:35:26+5:302022-04-05T14:35:41+5:30
मिठी मारुन लज्जास्पद वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे
पुणे : पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यावर लस्सी पिण्याच्या बहाण्याने महिलेला कात्रज डेअरी येथे घेऊन जाऊन तेथे मिठी मारुन लज्जास्पद वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मॉडेरेटर विकास पवार (रा. आंबेगाव खुर्द) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कसबा पेठेत राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्राध्यापिका असून त्यांच्याकडे १२ वीचे पेपर तपासण्याचे काम दिले होते. विकास पवार हा मॉडेरेटर म्हणून काम करीत होता. फिर्यादी यांना पेपर तपासण्याच्या कामात काही अडचण आल्यास त्या आरोपीला फोन करुन विचारत असत. सोमवारी १२ वीचे शेवटचे पेपर तपासून झाले. त्यानंतर विकास पवार याने या महिलेला लस्सी पिण्यासाठी दुपारी अडीच वाजता कात्रज डेअरी येथे नेले. तेथे त्याने हातात हात मिळवून त्यांच्या खांद्यावर हात टाकला. फिर्यादी यांनी त्यांचा हात झटकला असता त्याने फिर्यादीस मिठी मारुन मनास लज्जा उत्पन होईल, असे वर्तन केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.