छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय पुरंदरेंकडूनच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 05:42 AM2022-07-24T05:42:11+5:302022-07-24T05:42:34+5:30
शरद पवार यांचे विधान : महाराजांच्या खऱ्या गुरू जिजाऊच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेकांनी लेखन केले आहे; मात्र त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरेंकडूनच झाला, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. तसेच महाराजांचे गुरू रामदास किंवा दादोजी कोंडदेव नव्हे, तर जिजाऊ माँ साहेबच आहेत, असेही ते म्हणाले.
इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी सकाळी पद्मावतीमधील अण्णा भाऊ साठे सभागृहात झाले. त्यावेळी पवार बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते. इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पवार यांनी शिवचरित्र लेखन व लेखकांचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की, वास्तव इतिहास काय आहे, त्याचे लेखन अभ्यासपूर्वक करणे आवश्यक आहे. शिवछत्रपतींचे गुरू राजमाता जिजाऊ याच होत्या. दादोजी कोंडदेवांना गुरुस्थानी बसविणे पूर्णत: अनैतिक आहे.
डॉ. कोकाटे यांनी मनोगत व्यक्त करताना लेखनामागची भूमिका विशद केली. शिवरायांच्या इतिहासाने अनेक विचारप्रवाहांना प्रभावित केले आहे. त्यांच्याकडून त्यावर लेखन झाले आहे. ते समाजासमोर आणण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
जेम्स ग्रँट डफ याने मराठ्यांच्या इतिहासाचे चार खंड लिहिले आहेत. मला त्यातील दोन खंड मिळाले. मी ते विकत आणले, वाचले. ते संपूर्णपणे निर्दोष होते, असे म्हणता येणार नाही. त्याचाच आधार घेत बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषणे केली, लेखन केले. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष