महापालिका प्रभू श्री रामाचा पूर्णाकुर्ती पुतळा उभारणार, सर्वसाधारण सभेची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 08:31 PM2023-10-25T20:31:31+5:302023-10-25T20:31:41+5:30
पुणे : पुणे महापालिका हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्री रामाचा पूर्णाकुर्ती पुतळा उभारणार आहे. त्या बाबतच्या प्रस्तावाला पालिकेच्या ...
पुणे :पुणे महापालिका हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्री रामाचा पूर्णाकुर्ती पुतळा उभारणार आहे. त्या बाबतच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. राज्यसरकारचा नगरविकास विभाग, गृह विभाग तसेच पोलिस महासंचालक कार्यालयाने हा पुतळा उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून उभारला जाणारा हा देशातील पहिला पुतळा ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या बाबतचा प्रस्ताव २०१८ मध्ये दिला होता. या प्रस्तावानुसार महंमदवाडी-कौसरबाग मधील हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्री रामाचा पुतळा उभारला जावा, त्यासाठीच्या खर्चास मान्यता द्यावी असे नमुद केले होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर आॅगस्ट २०१९ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेने त्यास मान्यता दिली. पण सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारला जाणार असल्याने त्यास राज्यसरकारच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता.
त्यावर महाविकास आघाडीकडून या प्रस्तावावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. पण राज्यात राजकीय उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भानगिरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, सध्या त्यांच्याकडे शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत नगरविकास विभाग, गृह विभाग तसेच पोलीस महासंचालकांची मान्यता मिळवली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा महापालिकेकडे आल्यानंतर आयुक्त विक्रमकुमार यांनी नुकत्याच झालेल्या मुख्यसभेत त्यास मान्यता दिली आहे.या ठरावात प्रभाग क्रमांक २६ हांडेवाडी-कौसरबाग रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्रीरामाचे वास्तूशिल्प किंवा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे