बाळंतपणानंतर प्रथमच घरी आलेल्या पत्नीचा खून; दोघेही संगणक अभियंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:18 PM2022-12-05T21:18:22+5:302022-12-05T21:18:48+5:30
दोघेही संगणक अभियंता असून सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता
पुणे : बाळंतपणानंतर प्रथमच घरी आलेल्या अभियंता पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन अभियंता पतीने चाकूने वार करुन तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनीअटक केली. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. गुरुदत्त कॉलनी, फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, पतीपत्नी दोघेही संगणक अभियंता असून दोघेही नामवंत माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी यांच्या विवाह झाला होता. राजेंद हा पत्नीच्या चारित्र्याचा नेहमी संशय घेत असे. तिचा पगारही तो स्वत: कडे घेत होता. जूनमध्ये ज्योती हिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर रविवारी ती प्रथमच फुरसुंगी येथे रहायला आली. त्यांच्यात सोमवारी सकाळी वाद झाले. त्यात त्याने चाकूने तिच्यावर वार केले. ही माहिती त्याने स्वत:च घरमालकाला सांगितली. घरमालकाने तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता. हडपसर पोलिसांनी राजेंद्र गायकवाड याला अटक केली आहे.