नराधम बापाने पोटच्या लेकीवरच टाकला हात; वडगाव शेरी परिसरातील धक्कादायक घटना
By नितीश गोवंडे | Published: March 23, 2024 03:13 PM2024-03-23T15:13:13+5:302024-03-23T15:13:50+5:30
याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे : शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक घटनांमध्ये ओळखीचे, नातेवाईकच महिला-मुलींवर अत्याचार करत असल्याचे देखील दिसून येत आहे. अशाच एका घटनेत १६ वर्षीय मुलीवर तिच्या ४० वर्षीय बापानेच सातत्याने अत्याचार केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हर असून त्याने स्वत:च्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. आरोपीने पीडित मुलीला मारहाण करुन घरी कोणी नसताना वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला गोळ्या खायला दिल्या. मुलीने गोळ्या खाल्ल्या नाही तर तो जबरदस्तीने तिला गोळ्या खायला घालत होता. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आई, बहीण व भावाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना मारून टाकीन अशी देखील धमकी नराधम देत होता.
शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केले. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन नाराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.