चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी, आयुक्तांनी असा रचला सापळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:35 AM2022-03-28T10:35:32+5:302022-03-28T10:38:24+5:30
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून टोळी केली जेरबंद
पिंपरी(जि. पुणे) : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या टोळीचा छडा खुद्द कृष्ण प्रकाश यांनी केला. कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचून खंडणी घेणाऱ्याला जेरबंद केले. निगडी येथे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
रोशन संतोष बागूल, गायत्री रोशन बागूल (दोघेही, रा. सोनजाब, ता. दिंडोरी, जि. नाशिक, सध्या रा. देहूगाव), पूजा विलास माने (हडपसर, पुणे,) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. विन्सेन्ट अलेक्झंडर जोफेस (मोरे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी रविवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, तसेच त्यांचे बाॅस विश्वास नांगरे-पाटील हे ओळखीचे आहेत. आम्ही जमिनीचे मॅटर साॅल करतो. आम्ही पोलिसांची जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी आरोपी रोशन बागूल याने केली. महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेले बनावट ओळखपत्र तयार करून पोलीस दलाचा सदस्य असल्याचे भासवून सात हजार रुपये खंडणी गुगल पे वरून फसवणूक करून स्वीकारले.
असा रचला सापळा...
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचला. फिर्यादीने आरोपी रोशन बागूल याला पैसे घेण्यास फोन करून निगडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. पाचशे रुपयांची चलनातील खरी नोट व त्याखाली पाचशे व दोन हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाख रुपयांचे बंडल तयार केले. आरोपी रोशन बागूल हाॅटेलमध्ये आला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून तेथे आले होते. आरोपी रोशन बागूल याने पैसे स्वीकारल्यानंतर त्याला पकडण्यात आले. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून गेले.