राष्ट्रवादीनं खालच्या पातळीचं राजकारण केलं; मेघडंबरीबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:02 PM2022-03-08T20:02:37+5:302022-03-08T20:03:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले होते
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या वतीने उत्कृष्ट मेघडंबरी आणि त्यात सिंहासनाधिष्ठित महाराजांची मूर्ती या आवारात उभारण्यात आली. पण काल या मेघडंबरीचा थोडा भाग खाली पडला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. मेघडंबरीचे काम गळून पडल्याचाही आरोप राष्टवादीने केला होता. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महापालिकेच्या आवारातील मेघडंबरीबाबत राष्ट्रवादीने खालच्या पातळीचं राजकारण केलं असल्याचे मोहोळ यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून यावेळी सांगितले आहे.
मोहोळ म्हणाले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या अफवा पसरवल्या आहेत. मी पुणेकरांना वास्तव सांगण्यासाठी समोर आलो आहे. सर्वांना लोकशाहीचा अधिकार आहे. त्यांनी आंदोलन केलं याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्दल अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण त्यांनी केलं. आणि महापालिकेच्या आवारात जाऊन सांगितलं की, मेघडंबरी च काम गळून पडलं, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने असं काम केलं. असे त्यांनी आंदोलन केलं. अनेक वेळा त्यांच्या नेत्यांनी यांचे कान टोचले आहेत. परंतु पुणेकर आणि आम्ही त्याना गांभीर्याने घेत नाही. गेली ७० वर्षे महापालिकेत ही मंडळी सत्तेत होती. तेव्हा त्यांना पुतळा उभारता आला नाही. महापालिकेत स्मारक उभारले याचा पुणेकरांना अभिमान आहे. आम्ही भाजपच्या वतीने राष्ट्रवादीच्या प्रत्येक नगरसेवकाला निमंत्रण दिले होते. पण एकही नगरसेवक उपस्थित राहू शकला नाही. तेव्हा कुठं गेली होत यांची आत्मीयता. मात्र मेघडंबरीबाबत आंदोलन करायला तातडीने आले.
असा प्रसंग का घडला; महापौरांचे स्पष्टीकरण
मेघडंबरीला डेकोरेशन करण्याबरोबरच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे ते अत्यंत देखणे दिसत होते. त्याठिकाणी लाईट्स काम सुरु असताना मेघडंबरीला थोडा धक्का लागून एक तुकडा खाली पडला. हा छोटासा अपघात होता. राष्ट्रवादीने मात्र राजकारण केलं. मेघडंबरीचा भाग गळून पडला, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने हे काम केलं असं राजकारण केल. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.