Gudhi Padwa: निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण दिले अन् माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:14 PM2023-03-22T16:14:33+5:302023-03-22T16:14:43+5:30
गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दोघांनी सकाळीच घरी पुरणपोळ्यांचा बेत आखून निराधारांना स्वतःच्या हाताने जेवण दिले
इंदापूर : प्रत्येकाच्या घरात गुढी पाडव्याचा सण साजरा केला जातो. पण जे बेघर व निराधार आहेत त्यांचे काय असा स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आपल्या कृतीतून दिले. स्वतःच्या घरी केलेल्या पुरणपोळ्यांचा घास उष्टावण्याआधी इंदापूर एस.टी.बसस्थानकातील निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण देवून माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली.
रवी भोसले, अमोल मुसळे हे दोन पडस्थळ गावचे रहिवासी. दीनदुबळ्या निराधार जीवांबद्दल मनात अपार करुणा बाळगत जमेल तशी त्यांची सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अश्या लोकांना चपला, कपडे, अन्न देण्यापासून ते त्यांचे केस कापण्यापर्यंत शक्य ते सारे काही करण्याची या दोघांची तयारी असते. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या लोकांसाठी काही तरी करावे असा विचार त्यांच्या मनात आला. घराघरात गुढीपाडव्याचा सण साजरा होणार. या निराधारांचे काय ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनीच शोधले. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच घरी पुरणपोळ्यांचा बेत आखला. बाकी सारा सरंजाम तयार केला. सारे वेगवेगळ्या डब्यांमध्ये घालून इंदापूरचे एस.टी. बसस्थानक गाठले. तेथील निराधारांना स्वतःच्या हाताने जेवण दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी व अकलूज येथील बसस्थानकाकडे त्यांनी मोर्चा वळवला.