Protest MPSC Students in Pune: नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा; पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:56 AM2023-01-13T11:56:02+5:302023-01-13T11:56:11+5:30
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका
पुणे : पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससीच्या विद्यार्थयांनी आंदोलन केले आहे. परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत शुक्रवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलं आहे. आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होईल असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
एमपीएससी मंडळाने नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला. अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
एमपीएससीच्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. यामुळे एमपीएससी विरोधात आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही मुलांच्या भविष्याची काळजी वाटत आहे. अनेक विद्यार्थी शेती विकून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताय. परंतु वारंवार बदलणाऱ्या शासनाच्या धोरणाचा फटका त्यांना बसतोय.