"नव्या सरकारने भोंगे आंदोलनातील मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत", मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:51 PM2022-07-01T16:51:13+5:302022-07-01T16:51:20+5:30
गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे असल्याचे तमाम हिंदुस्थानला दाखवून द्यावे
पुणे : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यांचे मनसैनिकांकडून मनपूर्वक अभिनंदन. आपण हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येऊन सरकार स्थापन केल्याचा आनंद आम्हा मनसैनिकांना आहे. प्रखर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशनुसार राज्य भरातील मनसैनिकांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी आंदोलन केले होते. तत्कालीन सरकारने या प्रकरणी राज्यभरातील सुमारे २८ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे असल्याचे तमाम हिंदुस्थानला दाखवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केले आहे.
जयराज लांडगे म्हणाले, मनसे अध्यक्ष जयराज लांडगे यांनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्द्यावरून आक्रमक पुढाकार घेऊन राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला राज्यात सर्वस्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या प्रकरणी तत्कालीन सरकारने २८ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. हा आमच्यावरील अन्याय आहे. आपण हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन एकत्र आला आहात. त्यामुळे आम्ही मनसैनिक हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन तुमच्या सोबत आहोत. सुमारे २८ हजार मनसैनिकांवर विनाकारण दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे हे दाखवून द्यावे, असे आवाहन ही जयराज लांडगे यांनी केले आहे.