नवले पूल परिसर बनलाय " मौत का कुंआ"; प्रशासन मात्र "बघ्याच्या" भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:11 PM2022-11-22T15:11:45+5:302022-11-22T15:11:58+5:30
नागरिकांना जीव मुठीत घेऊन महामार्गावर करावा लागतो प्रवास
कल्याणराव आवताडे
धायरी : नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या दोन ठिकाणच्या वेगवेगळ्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, १३ जण जखमी झाले आहेत. तर ४८ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. सातत्याने अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात ''लोकमत''ने वारंवार पाठपुरावा केला. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे. तसेच कात्रज चौकाजवळ दोन भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लोकसभेत सांगितले. याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे-सातारा महामार्गावरील अपघातांची समस्या गंभीर आहे, हे खरे आहे. या महामार्गावर चार पूल होत आहेत. यामध्ये येणाऱ्या २५ दिवसांत एक पूल तयार होईल. बाकीचे तीन पूल हे जूनपर्यंत तयार होतील. हे चार पूल तयार झाल्यानंतर ही समस्या कमी होईल. तसेच सर्व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत असून, येत्या सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील, असे गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, २१ महिन्यानंतरही अद्याप येथील कामे पूर्ण झाली नाहीत.
नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक...
वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई - बंगळुरू असा आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केले.