पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:08 AM2022-06-24T11:08:02+5:302022-06-24T11:08:52+5:30
बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवारी ३६४ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६६४ वर पोहोचली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरात दोन दिवस पालखी सोहळा असल्याने लाखोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले होते. यामुळे पालखीनंतर रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता पालिकेकडून वर्तविण्यात आली आहे.
शहरात गेल्या चार महिन्यांपासून नियंत्रणात असलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ५० पेक्षाही खाली आली होती. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन बाधितांची आकडेवारी जाहीर करणेही थांबवले होते; परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
गुरुवारी शहरात ३६४ नवीन बाधितांची नोंद झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे असल्याने, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. सध्या एका रुग्णाला ‘नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलटर’वर ठेवण्यात आले आहे, तर दोघांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. हे सर्व रुग्ण हे अन्य सहव्याधीग्रस्त आहेत.
दरम्यान, कोरोना संसर्गाचे सौम्य स्वरूप आणि शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसून येत असली तरी, सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, असे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.