Subhas Chandra Bose: सरकार दरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:08 AM2023-03-28T11:08:18+5:302023-03-28T11:10:02+5:30
धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत....
पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राजकारणातील झंझावात होते. बोस यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतची कुजबुज आजही समाजात कानावर पडते. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतची संदिग्धता संपुष्टात आणून सरकार दरबारी त्यांच्या मृत्यूच्या अधिकृत तारखेची नोंद व्हावी, अशी मागणी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी केली.
अण्णाभाऊ साठे सभागृह येथे प्रथमेश गोसावी, आशुतोष नर्लेकर आणि संजय गोसावी यांनी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. धर आणि घोष हे वीस वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत.
यावेळी त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास पुणेकरांच्या अंगावर रोमांच आणणारा ठरला.
अनुज म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लोकमान्य टिळक यांच्यात घनिष्ठ संबंध आणि दीर्घ संवाद होता. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगामध्ये असताना नेताजी सुभाषचंद्र बोस देखील तिथे शिक्षा भोगत होते. ब्रिटिश साम्राज्याला ज्या भारतीय नेत्यांपासून धोका होता, अशा नेत्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्याचा त्याकाळी प्रघात होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात मृत्यू झाला होता, हाच इतिहास भारताला माहिती आहे पण खरेच त्यांचा मृत्यू झाला होता का, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का, त्यांच्या जगण्यावरून किंवा मृत्यूवरून राजकारण करायचे होते का, अशा अनेक प्रश्नांची उकल यावेळी अनुज धर यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाद्वारे केली.
चंद्रचूड म्हणाले की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला का, नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहत होते का, नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, नेताजीनंतर कोणत्या नावाने वावरत होते आणि भारत सरकारने आतापर्यंत नेताजींसंदर्भात असलेल्या गोपनीय फाईल्स समोर का आणल्या नाहीत, या प्रश्नांची उत्तरे आमच्या संशोधनाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.