Narendra Modi:मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:02 PM2024-10-05T13:02:35+5:302024-10-05T13:04:30+5:30
पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले
पुणे : पुण्याच्या औंध भागातील भाजपचा निष्ठावंत पदाधिकारी मयूर मुंडे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रती प्रेमाच्या भावनेने औंध भागात मंदिर उभारले होते. पण पक्षावर नाराजी व्यक्त करून त्यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना राजीनाम्याचे पत्र देऊन भाजपला रामराम ठोकला आहे.
औंध भागातील भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांचे मयूर मुंडे हे बंधू आहेत. २०१९ साली मयूर मुंडे यांनी औंध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारले होते. त्यावेळी त्यांच्यावर टीका होऊ लागली. विरोधकांनी त्यांच्याविरोधात आंदोलनेही केली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून त्यांना मंदिर काढण्याचा फोन आला होता. त्यांनी पुतळा मंदिरातून काढून तातडीने आपल्या ऑफिसमध्ये ठेवला होता. संपूर्ण भारतात मोदींच मंदिरात आतापर्यंत कोणीही उभारले नव्हते. परंतु या निष्ठावंत कार्यकर्त्याने मोदींच्या प्रेमाखातीर थेट मंदिर उभारले. आता मात्र त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
पत्रात काय नमूद केले?
मी मागील अनेक वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणूनकाम करत आहे. मी औंध भागात पुणे वार्ड अध्यक्षापासून ते शिवाजीनगर मतदार संघाचा युवा मोराचा उपाध्यक्ष या पदापर्यंत पक्ष संघटनेचे अत्यंत निष्ठेने काम केले. परंतु पक्षात काही वर्षांपासून निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिले जात आहे. माजी पदाधिकाऱ्यांना अपमानित करणे, त्यांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे, त्यांना निवडणुकीत समाविष्ट न करणे. स्थानिक आमदार यांच्यामार्फ़त निष्ठावंत वगळून इतर पक्षातील भरती केलेल्या लोकांना निधी वाटप करणे अशा अनेक कारणांमुळे त्यांनी सर्व पदासह सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकात नमूद केले आहे.