ज्याचा दशक्रिया घातला तोच दुसऱ्या दिवशी परतला अन् कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:36 PM2022-12-27T17:36:54+5:302022-12-27T17:37:15+5:30
अपघातात शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे असल्याने पोलिसांनी घटनेचा छडा लावत आरोपीचे पितळ उघडे पाडले
आळंदी : आता सहवास नसला तरी, स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुमची येत राहील, अशा आशयाचा भलामोठा बॅनर लावून एका साठ वर्षीय माणसाचा सातशे ते आठशे लोकांच्या उपस्थितीत दशक्रिया विधी घालण्यात आला. शोकाकुल वातावरणात मान्यवरांची भाषणेही झाली. मात्र, दशक्रियाच्या दुसऱ्या दिवशी ज्यांचा दशक्रिया घातला तेच महाशय घरी परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
खेड तालुक्याच्या चऱ्होली खुर्द गावातील ही घटना आहे. सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे यांची ही अचंबित करणारी क्राईम स्टोरी आहे. सुभाष थोरवे यांचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन राहायचे होते. यासाठी त्याने त्याच्याच मृत्यूचा चित्रपटाला शोभेल असा बनाव केला. दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे करत त्याला स्वतःचे कपडे घालून मृतदेह ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटरमशीनमध्ये फिरवून त्याची निर्घृण हत्या केली. त्यात तो काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. थोरवे कुटुंबीयांनी मृतदेह शेतात पाहिला तेव्हा त्याला डोके नव्हते; पण अंगावर सुभाष उर्फ केरबा याचे कपडे होते. त्यामुळे तो मृतदेह केरबा यांचाच असल्याचे सर्वांना भासले. अपघाती निधन झाल्याचे कुटुंबीयांनी मान्य करत अंत्यविधी घातला. दहा दिवसांनी दशक्रिया विधीही झाला.
मात्र, या अपघातात शंका घेण्यासारखे अनेक मुद्दे असल्याने पोलिसांनी घटनेचा छडा लावत सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे याचे पितळ उघडे पाडले. आळंदीपोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.