माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 08:14 PM2024-06-30T20:14:53+5:302024-06-30T20:16:41+5:30
उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार
पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे कालच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. लाखो वारकऱ्यांना घेऊन माऊली विठुरायाच्या भेटीला निघाले. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी माऊलींच्या पालखी सोहळयात सहभागी झाले आहेत. पुणेकर आतुरतेने वाट पाहत असताना आज सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले.
सर्वत्र माऊलींचा जयघोष, टाळ - मृदंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी पालखीचे दर्शन घेतले. यंदा प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छतेबरोबरच, सर्व सुविधा महापालिकेकडून पुरवण्यात आल्या आहेत. तसेच माऊलींच्या स्वागतासाठी रस्त्यावर नयनरम्य रांगोळी काढण्यात आली आहे. दुकानदार, व्यापारी वर्ग, नागरिक यांच्याकडून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले आहे. उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. पुणेकरांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी उद्याचा पूर्ण दिवस मिळणार आहे.
आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भल्या सकाळीच वारीची वाट चालू लागला. इंद्रायणी ओलांडून देहूफाट्यावरून रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास शहरात आगमन झाले. वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात विसावा झाला. त्यानंतर दिघीच्या मॅक्झिन चौकात स्वागत केले. वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा विश्रांतवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. मार्गावर वारकऱ्यांना अन्नदान, चहा नास्ता वाटप करण्यात आले. दर्शनासाठी गर्दी लोटली होती. मार्गावर राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लक्षवेधी होते.