ज्या पक्षाने मला मोठे केले, त्या पक्षाला खूप मोठे करा : मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:57 AM2024-11-19T09:57:45+5:302024-11-19T10:01:53+5:30
भारतीय जनता पार्टीने तुमच्यातील एका मुलाला संधी देऊन मोठे केले आहे.
पुणे : मुळशीकरांनी ठरविले आणि ते खरे झाले नाही, असे कधीही झाले नाही. भारतीय जनता पार्टीने तुमच्यातील एका मुलाला संधी देऊन मोठे केले आहे. त्यामुळे पक्षालाही आता अधिकाधिक मतदान करून मोठे करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर नगरसेवक होऊन मी राजकीय प्रवास सुरू केला. आज तुमचा मुळशीकर नरेंद्र मोदींसोबत काम करतो आहे. तुमचा माणूस मोठा होतो आहे. हे सर्व भारतीय जनता पक्षाने मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्यांची कामे मुळशीत झाली. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षांत ८४ कोटींची विकास कामे त्यांनी केली. मुळशीच्या विकासासाठी त्यांनी खूप योगदान दिले आहे.
पाटील म्हणाले, कोथरूड आणि भोर विधानसभा मतदारसंघावर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हणालो होतो, त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्र फडणवीसांना आणि मला संधी मिळाली. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचा प्रघात आहे. अडीच वर्षांपैकी एक वर्ष मला पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले, तेव्हा मुळशीची जी व्यक्ती काम घेऊन येई, ती कामे पूर्ण केली.