SPPU: पुणे विद्यापीठात रंगणार आदिवासी कथेवरून प्रेरित 'संगीत कमली की सत्त्वपरीक्षा' नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 02:06 PM2022-03-25T14:06:45+5:302022-03-25T14:07:09+5:30
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ललित कला केंद्राकडून आयोजित प्रयोगाला प्रवेश विनामूल्य
पुणे : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत 'संगीत कमली की सत्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या कहलाता है ?' या नाटकाचा पहिलाच प्रयोग दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सं. ७ वा. विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात होईल. साधारणपणे लोककला प्रकाराच्या अंगाने उभ्या केलेल्या या नाट्यात नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ आहे.
विवाहसंस्थेला धरून पूर्वापार चालत आलेले सामाजिक संकेत आणि सर्वमान्य चौकटी माणूस जनरीत म्हणून स्वीकारतो. तथाकथित सुसंस्कृत बनून राहण्यासाठी, नातं टिकवून ठेवण्याच्या हट्टात; स्वतःशीच चाललेल्या झगड्याला आणि त्यातून होणाऱ्या दमनाला हे नाट्य अधोरेखित करतं. प्रेक्षकाला प्रश्न विचारू पाहतं. हे नाटक एका आदिवासी कथेवरून प्रेरित असून त्याचे लेखन शंतनू अडसूळ व दिग्दर्शन महेश खंदारे यांनी केले आहे.
ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम अर्थात रेपर्टरी; ही भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच पारंपारिक व समकालीन नाटक महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आली. या अंतर्गत 'अपवाद आणि नियम' आणि 'वाघाची गोष्ट' यानंतरचं हे तिसरं नाटक असल्याचे ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितले.