Pune: पोलिस आले अन् निघून गेले; चोरट्यांनी गार्डला चोपले, येरवड्यातील प्रकार
By विवेक भुसे | Published: August 12, 2023 04:42 PM2023-08-12T16:42:19+5:302023-08-12T16:43:34+5:30
सुरक्षा रक्षकाला बांबूने मारहाण केल्याचा प्रकार समोर...
पुणे : येरवडा येथील विसर्जन घाटावरील नदी सुधार प्रकल्पातील लोखंडी पाइप चोरून नेणाऱ्या चोरट्यांना सुरक्षा रक्षकाने हटकले; तसेच पोलिसांना बोलावले असता ते पळून गेले. पोलिस निघून गेल्यावर पुन्हा येऊन चौघांनी सुरक्षा रक्षकाला बांबूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विनोद ज्ञानोबा वाघंबरे (वय ३४, रा. चिखली, पिंपरी-चिंचवड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार येरवडा येथील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या गणेश विसर्जन घाट येथे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे गणपती विसर्जन घाट येथे रात्रपाळीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यावेळी दोन चोरटे मुठा नदी सुधार प्रकल्प येथे आले. त्यांनी प्रकल्पावरील लोखंडी प्रॉमस (लोखंडी स्पोर्ट पाइप) घेऊन जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना हटकले असता, ते दमबाजी करू लागले. फिर्यादी यांनी पोलिसांना बोलावले. पोलिस येईपर्यंत चोरटे पळून गेले. चोरटे पळून गेल्याने पोलिस निघून गेले. त्यानंतर ते दोघे चाेरटे व त्यांचे आणखी दोन साथीदार पहाटे पुन्हा तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी अक्षय गजभिव यांना बांबूने मारहाण करून जखमी केले. येरवडा पोलिस तपास करीत आहेत.