Video: नाकाबंदी दरम्यान पोलिसाचा प्रताप! चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले, कल्याणीनगर भागातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 04:29 PM2024-06-02T16:29:26+5:302024-06-02T16:31:24+5:30
पोलिसांनी वाहन चालकास आडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला तर एका पोलीस अधिकाऱ्याने युवकाला चक्क पाय दाबण्यास सांगितले
पुणे: पॉर्शे कार अपघातामुळे कल्याणीनगर हे नाव एव्हाना सर्वदूर पोहचलं, याच कल्याणीनगर परिसरात नाकाबंदी दरम्यान रात्रीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांचा एक प्रताप समोर आलंय. काल रात्री कल्याणीनगर परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आधीच पोर्षे अपघात प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर सुरुवातीला संशय व्यक्त केला होता, या प्रकरणात हलगर्जिपणा केल्यामुळे येरवडा पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यात आता पुन्हा पोलिसांचा कारनामा समोर आलाय. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांनी वाहन चालकास आडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. एका पोलीस अधिकाऱ्याने युवकाला चक्क पाय दाबण्यास सांगितले, अशी प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर आणि माध्यमांवर दिसताच वाहतूक पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
नाकाबंदी दरम्यान पोलिसाचा प्रताप! चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले, कल्याणीनगर भागातील प्रकार#punepolice#traffic#bike#actionpic.twitter.com/TLCvVWYr53
— Lokmat (@lokmat) June 2, 2024
पीएसआय गोराडे, वय ५७, येरवडा वाहतूक विभाग हे ॲडलॅब्स चौक, कल्याणीनगर येथे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होते. 2 दिवस रात्री आणि दिवसा सलग ड्युटी केल्यामुळे त्यांची साखर 550 पर्यंत वाढली. त्यामुळे त्यांच्या पायात क्रॅम्प आला त्यामुळे संबंधित व्यक्ती जो व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायातील क्रंप काढण्यासाठी मदत केली असे पोलिसांनी सांगितले.