पोलिसांचा हॅकरच निघाला लुटारू; पुण्याच्या पंकज घोडेची ४ वर्षांत २५० कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:43 AM2022-03-30T07:43:55+5:302022-03-30T07:44:08+5:30
खासगी कंपनीत ५० हजारांची नोकरी करणारा घोडे याने ४ वर्षांत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तब्बल २५० कोटींची उलाढाल केली
पुणे : आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अमित भारद्वाज याच्या विरोधातील बिटकॉइन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून पोलिसांनी ज्याची मदत घेतली त्या पंकज घोडे यानेच पोलिसांची फसवणूक केली. खासगी कंपनीत ५० हजारांची नोकरी करणारा घोडे याने ४ वर्षांत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून तब्बल २५० कोटींची उलाढाल केली. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून त्याने मनी लाँड्रिंग केल्याची शक्यता आहे.
काही वर्षांपासून तो पुणे पोलिसांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याने आरोपींच्या वॉलेटमधून काही बिटकॉइन इतर वॉलेटला वळविल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आभासी चलनावर वेगवेगळ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांना घोडे प्रशिक्षण देत असे. दिल्ली पोलिसांसाठीही त्याने प्रशिक्षणवर्ग घेतले. त्याची पोलीस आयुक्तालयात चार वर्षांपासून ऊठबस वाढली होती. तो ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन कंपनीचे काम करीत होता. २०१८ पासून वेगवेगळ्या कंपन्या त्याने स्थापन केल्या. त्यातील ‘ॲग्री १० एक्स’ कंपनीला मोठे यश मिळाले आहे. यात शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यात दीड लाख शेतकऱ्यांचा सहभाग असून, ६ हजार पुरवठादार, ४ हजार २०० ट्रेडर्स, ८२ वस्तूंची विक्री केली जाते.
३ मोबाइल, २ मॅकबुक, २ टॅब जप्त
पंकज घोडेकडून ३ मोबाइल, २ मॅकबुक, ३ हार्ड डिस्क, २ टॅब, २ लॅपटॉप, ४ सिडी, ६ पेनड्राइव्ह, २ मेमरी कार्ड जप्त केले असून या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. घोडे याने अगोदर आपले क्रिप्टो वॉलेट नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्याने अनेक वॉलेटमध्ये आरोपींचे क्रिप्टो बिटकॉइन वळविल्याचे आढळले. याचा शोध घेण्यास पोलिसांनी पासवर्डची विचारणा केली तेव्हा त्याने चुकीचा पासवर्ड दिला. त्यामुळे ते वॉलेट लॉक होण्याची शक्यता असल्याने त्याचे क्लोनिंग केले जात आहे.