आराेग्य संचालक पद रिक्त; बदल्या, भरत्या, खरेदी प्रक्रियेची कामे रखडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 02:51 PM2023-08-23T14:51:28+5:302023-08-23T14:52:11+5:30
१३ दिवसांपासून पद रिक्त...
पुणे :पुणे आणि मुंबई येथील दाेन्ही आराेग्य संचालकांची पदे रिक्त असून याला १३ दिवस झाले तरी अजुनही पदे भरलेले नाहीत. त्यामुळे, आराेग्य विभागातल्या विनंती बदल्या, नवीन भरती प्रक्रिया, लाखाेंची खरेदी आणि मंजुरी प्रकरणे रखडली आहेत. एकीकडे आराेग्यमंत्री खात्याचे पूर्ण स्ट्रक्चर बदलण्याची भाषा करतात आणि साधा संचालक नियुक्त का करत नाहीत, असा प्रश्न आता आराेग्य क्षेत्रातील जाणकारांकडून विचारला जात आहे.
आराेग्य संचालक हा आराेग्य खात्याचा प्रमुख असताे. मुंबई आणि पुणे असे दाेन आराेग्य संचालक पदे आहेत. कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, नवीन भरती, औषधे किंवा इतर साहित्यांची खरेदी, कारवाया, नवीन कामांना मंजुरी आदी प्रकरणे राज्यभरातून रखडली आहेत. त्यामुळे आराेग्य सेवेचे स्थानिक, विभागीय कामकाज पूर्णपणे रखडले आहे. इतके दिवस संचालक पद रिक्त राहते याचा अर्थ आराेग्य खाते चालवायचे आहे की बंद करायचे आहे, असाही प्रश्न विचारला जात आहे.
माेठया निर्णयांच्या फाईल्स जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आराेग्य अधिकारी पुढे आराेग्य उपसंचालकांच्या आणि आराेग्य संचालकाच्या सहीने मंत्रालयाकडे जातात. तेथे आराेग्य आयुक्त, सचिव यांनी मंजुरी दिल्यानंतर ते काम मार्गी लागते. परंतु, संचालकच नसल्याने राज्यात सर्वच ठिकाणी सर्व प्रकारच्या कामांचा खाेळंबा झाला आहे. सर्व फाईलिंचा ढीग पडून आहे. त्यामुळे, काम कसे करायचे असा प्रश्न आराेग्य खात्यातील अधिका-यांना पडला आहे.
आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तीन ते चार दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्या खात्याने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजाेखा मांडला हाेता. त्यामध्ये त्यांनी खात्यामध्ये नवनवीन उपक्रम सूरू करण्याचे तसेच बिंदुनामावली तयार करण्यापासून परिमंडळांचा विस्तार ८ हून २० करण्याची घाेषणा केली आहे. साेबतच येत्या दाेन ते तीन दिवसांत आराेग्य संचालकांचे पद भरले जाईल, असेही स्पष्ट केले हाेते. आराेग्यमंत्री खात्याचा कायापालट करण्याच्या घाेषणा करतात मात्र, अजुनही एक संचालक नियुक्त केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.