‘सीएनजी’चा वाढला भाव, जगायचे कसे राव? रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बिकट

By नितीश गोवंडे | Published: August 5, 2022 10:17 AM2022-08-05T10:17:03+5:302022-08-05T10:17:16+5:30

पुण्यात ९० हजार रिक्षा असून ४० टक्के रिक्षा नवीन

The price of CNG has increased how to survive The financial condition of rickshaw pullers is dire | ‘सीएनजी’चा वाढला भाव, जगायचे कसे राव? रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बिकट

‘सीएनजी’चा वाढला भाव, जगायचे कसे राव? रिक्षाचालकांची आर्थिक स्थिती बिकट

googlenewsNext

पुणे : सलग चार महिन्यांपासून सीएनजीचा दर वाढत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांसह, मोटार मालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांची कमाई कमी झाली आहे. त्यांना मिळणारे उत्पन्न फक्त सीएनजी भरण्यातच जात असल्याने घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यंदा २ एप्रिलपासून ३ ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत सीएनजीचे दर २८.८० रुपयांनी वाढले आहेत.

पुण्यात ९० हजार रिक्षा असून ४० टक्के रिक्षा नवीन आहेत. त्यातच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी २००९ साली सर्वोच्च न्यायालयाने सीएनजीची सक्ती केल्याने, रिक्षा चालकांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. आज ९१ रुपये प्रति किलो दराने सीएनजी रिक्षात भरायचा, ऑईल टाकायचे म्हणजे १०० रुपये रिक्षा चालकांचा खर्च आहे. तसेच रिक्षाच्या मीटरची सुरुवात २१ रुपयांनी होत असल्याने रिक्षा चालकांना रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. सीएनजी सोबतच इतर जीवनाश्यक वस्तू आणि शैक्षणिक खर्चदेखील महागला असल्याने रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले आहे.

जानेवारीपासून आजपर्यंतचा सीएनजी दर..(प्रति किलो) :-
जानेवारी - ६६, फेब्रुवारी - ६८, मार्च - ७३, एप्रिल - ७७.२०, मे - ८०, जून - ८२, जुलै - ८५ आणि ३ ऑगस्ट - ९१ रुपये

सीएनजीचे ६० अन् पेट्रोल-डिझेलचे ५५० पंप

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ६० सीएनजी पंप आहेत. या पंपावर तीन लाखांपेक्षा अधिक वाहने सीएनजी भरतात. पुणे शहरात मध्यवर्ती भागात मात्र सीएनजी पंपांची संख्या अत्यंत कमी आहे. प्रेशर कमी असणे आणि अनेकदा पंप बंद असल्याने किमान तासभर वेळ सीएनजी भरण्यासाठी लागतो. पुण्यात एका दिवसात साधारण ७ ते ८ लाख किलो सीएनजीची विक्री होते. पुणे जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे ५५० पंप आहेत.

हातात कमाई कमीच मिळते

एका किलोमध्ये रिक्षा साधारण ३५ किमी अंतर जाते. यामध्ये रिक्षाचालकांना इंधनाचे पैसे जाऊन किमान दीडशे-दोनशे रुपये हातात मिळतात. पूर्वी ६० रुपये किलो सीएनजी असताना चांगले पैसे हातात राहायचे, असे रिक्षाचालकांनी सांगितले. सध्या शहरात तीन लाख सीएनजी वाहनांमध्ये ९० हजार रिक्षा आहेत.

भाडेवाढ झाली तर मीटरचा खर्च...

आरटीओने आमच्या मागण्या मान्य करत भाडेवाढ जरी केली तरी त्यासाठी ६०० रुपये मीटरला खर्च येतो. मीटरचे प्रोग्रॅमिंग बदलण्यासाठी हा खर्च लागतो. खर्चासह प्रोग्रॅमिंग बदलण्यासाठी रिक्षाचालकांची गर्दी होते त्यामुळे वेळही वाया जातो. त्यानंतर आरटीओकडून टेस्ट करून घेणे गरजेचे असते. यामध्ये रिक्षाचालकासह आरटीओ कार्यालयाचाही वेळ वाया जातो.

ॲपला परवागनी द्यावी..

मीटरपेक्षा ॲपला आरटीओने जर परवानगी दिली तर ते सगळ्यांसाठीच सोयीचे ठरेल. सध्या रिक्षाच्या मीटरप्रमाणे ॲपदेखील उपलब्ध आहेत, मग मीटरचाच आग्रह का केला जातो? तसेच ॲपला मान्यता द्यायची कशी हा प्रश्नदेखील आरटीओ कार्यालयासमोर असल्याने ॲपला परवानगी कधी मिळेल? हा आमचा प्रश्न आहे.

खासगी कंपन्यांमुळे नुकसान अधिक...

आम्हाला प्रवासी मिळण्यासाठी काही खासगी कंपन्यादेखील बाजारात आहेत. पण बेकायदेशीरपणे जीएसटी आणि सर्व्हिस चार्जच्या नावाखाली आमचे पैसे कापले जातात. खरेतर रिक्षातून प्रवास करण्यासाठी वेगळी कंपनी स्थापन करणे हेच यंत्रणेला आवाहन आहे. याचा फायदा आम्हा कष्टकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक होतो.

शेअर बाइक अनधिकृत..

शेअर बाइक या ॲप बेस्ड कंपन्या आहेत. चारचाकी अथवा रिक्षाला परमिट असल्याने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा असते. दुचाकीला परमिट नसल्याने कायद्याविरोधात शेअर बाइक चालविल्या जातात.

ग्राहकांना फटका...

सीएनजी दर वाढले याचा अर्थ आज ना उद्या रिक्षाची भाडेवाढ होणार हे निश्चित. रिक्षाचालकांच्या समस्या एकीकडे वाढत असताना भाडेवाढ झाली तर ग्राहकांनादेखील याचा मोठा फटका बसतो. नियमित रिक्षाने प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थ्यांनी ने-आण करणाऱ्या रिक्षांचे मासिक भाडे वाढणार यामुळे थेट ग्राहकाचा खिसादेखील रिकामा होण्यास हातभार लागणार आहे.

या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार..

सततच्या वाढत्या सीएनजी दराला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. सीएनजीचे ५३ टक्के उत्पादन आपल्या देशातच होत असताना सतत ही दरवाढ का? याचा फायदा फक्त सीएनजी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. सरकारकडून आम्हाला सीएनजीवर अनुदान मिळाले पाहिजे, नाहीतर आम्हाला भाडेवाढ द्यावी आणि देशात उत्पादित होणऱ्या सीएनजीचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दराप्रमाणे ठरवणे बंद करून, त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित असावा. - नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

२-३ किमीसाठी फक्त २१ रुपये

आजची सीएनजी दरवाढ आम्हाला कशाच पद्धतीने परवडणारी नाही. २ ते ३ किमीसाठी आम्हाला २१ रुपयेच प्रवाशांकडून घ्यावे लागतात. आधीच कोरोनानंतर आमचे उत्पन्न घटले आहे. पेट्रोल एवढे दर जर सीएनजीचे करायचे होते तर आम्हाला सीएनजीची सक्ती का केली? आमची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. - अश्कान शेख, रिक्षाचालक

Web Title: The price of CNG has increased how to survive The financial condition of rickshaw pullers is dire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.