Narendra Modi Visit Pune: पंतप्रधानांची स्वारी येणार; म्हणून पुण्यात रस्ते दुरुस्ती सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:58 IST2022-03-01T13:58:09+5:302022-03-01T13:58:35+5:30
खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यालगतचे पदपथ व डिव्हायडरची रंगरंगोटी करणे, पथारी व्यावसायिक यांना हलविणे, अतिक्रमणे काढणे ही कामे प्राधान्याने सुरू

Narendra Modi Visit Pune: पंतप्रधानांची स्वारी येणार; म्हणून पुण्यात रस्ते दुरुस्ती सुरु
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिवस-रात्र कामाला लागली आहे.
पंतप्रधान येत्या रविवारी दि. ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास व त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा व अन्य ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ज्या रस्त्यांनी जाणार आहेत तो मार्ग चकाचक करणे व अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आह़े. यात खड्डेमुक्त रस्ते, रस्त्यालगतचे पदपथ व डिव्हायडरची रंगरंगोटी करणे, पथारी व्यावसायिक यांना हलविणे, अतिक्रमणे काढणे ही कामे प्राधान्याने सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, या मार्गावरील व सभा स्थानाजवळील सर्व ओव्हर हेड केबल हटविण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या सर्व ओव्हर हेड केबल हटविल्यामुळे कर्वे रस्ता, पौड रस्ता परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या परिसरातील बहुसंख्य ठिकाणचे इंटरनेट कनेक्शन खंडित झाले आहे.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी, शहरात अनेक कंपन्यांनी अनधिकृतरीत्या आपल्या इंटरनेट, ब्रॉडबँड व अन्य केबल ओव्हर हेड पद्धतीने टाकल्या असून, त्या हटविण्याबाबत वारंवार सूचना करण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्या काढल्या नसल्याने महापालिकेकडून त्या हटविण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.