बंदीही म्हणणार संतांचे अभंग; राज्यातील कारागृहात होणार अभंग - भजन स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 04:28 PM2022-05-09T16:28:59+5:302022-05-09T16:29:29+5:30
स्पर्धा राज्यातील पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात होणार असून स्पर्धेत एकूण 27 संघ सहभागी झाले आहेत
पुणे : कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा राज्यातील पश्चिम, दक्षिण, मध्य आणि पूर्व अशा चार विभागात होणार असून स्पर्धेत एकूण 27 संघ सहभागी झाले आहेत. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. बंदिजनांसाठी आयोजित केलेली ही आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पंडित रघुनाथ खंडाळकर, प्रा सगीरा शेख, प्रा शिवानी अबनावे उपस्थित होते.
पश्चिम विभाग दि. 20 ते 30 मे , दक्षिण विभाग दि. 1 जून ते 10 जून , मध्य विभाग दि. 11 जून ते 20 जून आणि पूर्व विभाग दि. 21 जून ते 30 जून या कालावधीत स्पर्धा प्रत्येक कारागृहात होणार आहे.
स्पर्धेतील स्पर्धकांना सादरीकरणासाठी 25 मिनिटांचा वेळ दिला जाणार असून, स्पर्धक एकूण चार रचना सादर करणार आहेत. त्यामध्ये कुठल्याही संत श्रेष्ठींच्या अभंग रचनांपैकी तीन रचना व चौथी रचना कोणत्याही सामाजिक विषयावर अभंग वा भजनाच्या धर्तीवर सादर करायची आहे. ही रचना स्वतंत्ररित्या रचलेली असावी अशी अट आहे. सर्व रचना वाद्यांच्या साथीने सादर करता येणार आहेत. स्वरचित रचनेसाठी पश्चात्ताप, प्रामाणिकपणा, समाजसेवा असे विषय देण्यात आले आहेत. निवड झालेल्या तीन संघांची महाअंतिम फेरी शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात येणार आहे.
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सदस्य कारागृहात जाऊन स्पर्धेचे परिक्षण करणार आहेत.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय चार फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 100 पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.