महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके
By राजू हिंगे | Published: November 25, 2024 09:00 PM2024-11-25T21:00:01+5:302024-11-25T21:01:59+5:30
हाके म्हणाले,'जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.'
पुणे : राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील. विधानसभा निवडणुकीचा निकाल ही मनोज जरांगे-पाटील यांना चपराक आहे. यंदाच्या निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हाके म्हणाले, जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पावले उचलली. ती सर्वांनाच मान्य होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे होते. हा त्यांचा हेकेखोरपणा आहे. मराठा समाजात जागरूकता निर्माण करण्याऐवजी जरांगे राजकारण खेळू लागले. ठराविक पक्षाला निवडून आणा, ठराविक पक्षाचे उमेदवार पाडा, ही त्यांची भूमिका नागरिकांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी विरोध केलेले उमेदवारही विविध ठिकाणी सहज निवडून आले, असे हाके यांनी सांगितले.
मला मंत्री करावे
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, यामध्ये ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे. या समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी मी राज्यभर दौरे केले. त्याचा उपयोग महायुतीला झाला. त्यामुळे माझ्या क्षमता लक्षात घेऊन मला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. केवळ विधान परिषदेवर जाण्यात मला स्वारस्य नाही, अशी मागणी महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.