महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू; ३८ हजारांहून अधिक संस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 12:07 PM2024-06-08T12:07:03+5:302024-06-08T12:08:07+5:30
राज्य सरकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मार्चमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते...
पुणे : नव्या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था, तसेच आतापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सुमारे ३८ हजार ७४० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने ३१ मेपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता या निवडणुका आहे त्या टप्प्यानंतर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. १०) या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मार्चमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. यासाठी राज्यातील सुमारे ३८ हजार ७४० सहकारी संस्थांची निवडणूक पार पडणार होती. मात्र, १६ मार्चला लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने या निवडणुकांना स्थगिती दिली होती. या स्थगितीपूर्वी राज्यातील १० हजार ७८३ निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या होत्या.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सहकार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती. त्यामुळेच या निवडणुका रखडल्या होत्या. आता आचारसंहिताही संपली असून, राज्य सरकारने या निवडणुका पुन्हा घेण्यास संमती दिली आहे. राज्य सहकारी प्राधिकरणाने त्या संदर्भातील आदेश काढले आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केलेल्या टप्प्यावरून पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील सुमारे २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या वर्षभरात करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ९३ हजार ३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. यातील डिसेंबरअखेर ९३ हजार ४४२ निवडणुकांसाठी पात्र होत्या. त्यापैकी ५० हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. उर्वरित सहकारी संस्थांपैकी १० हजार ७८३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती, तर २० हजार १३० सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र, प्रलंबित आहेत. तसेच यंदाच्या २०२४ या वर्षात ७ हाजर ८२७ सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सर्व ३८ हजार ७४० सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे.
निवडणूक पात्र संस्था ९३,३४२
प्रक्रिया सुरू १०,७८३
प्रलंबित २०,१३०
२०२४ मध्ये पात्र ७,८२७