डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज
By नितीन चौधरी | Published: October 11, 2023 03:34 PM2023-10-11T15:34:15+5:302023-10-11T15:34:40+5:30
खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज
पुणे : राज्यात यंदा उशीरा आलेल्या पावसामुळे व त्यानंतरच्या खंडामुळे तृणधान्यांचे उत्पादन १८ टक्क्यांनी कमी होणार आहे. तर डाळींच्या उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट होणार आहे. खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाने दिलेल्या पहिल्या नजर अंदाजात ही आकडेवारी देण्यात आली आहे.
राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले परिणामी मुगाचे पेरणी क्षेत्र सरासरीच्या ५४ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी यंदा मुगाचे उत्पादन केवळ ६० हजार टन होण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ६६ टक्क्यांनी कमी आहे. उडदाची पेरणी सरासरीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी झाली. परिणामी, यंदा केवळ ८७ हजार टन उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन २ लाख २६ हजार टन इतके झाले होते. सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे.
तुरीचे उत्पादन ३० टक्के कमी
तुरीची लागवड यंदा ११ लाख १३ हजार हेक्टरवर झाली. सरासरी लागवड क्षेत्राच्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांनी यात घट दर्शविण्यात आली आहे. यंदा तुरीचे उत्पादन ८ लाख ७६ हजार टन उत्पादन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ९ लाख २६ हजार टन इतके होते. सरासरीच्या तुलनेत यंदा उत्पादनात ३० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.
भात उत्पादनात मात्रस वाढ
यंदा भाताचे ३४ लाख ४८ हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये १३ टक्क्यांची वाढ होईल. खरीप ज्वारीचे उत्पादन ९१ हजार टन इतके अपेक्षित असून सरासरीच्या तुलनेत त्यात ६७ टक्क्यांची घट होईल. बाजरीचे उत्पादन २ लाख टन येण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या तुलनेत यात ६६ टक्क्यांची घट होईल. मक्याच्या उत्पादनातही सरासरीच्या तुलनेत ४१ टक्क्यांची घट होईल असा अंदाज आहे. यंदा मक्याचे उत्पादन १३ लाख ५८ हजार टन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन २७ लाख १२ हजार टन इतके झाले होते.
सोयाबीन २१ लाख टनांनी कमी, कापूसही कमी पिकणार
राज्यात यंदा सोयाबीनची लागवड ५० लाख ५४ हजार हेक्टरवर झाली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, या पिकाला पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचे दिसून येत आहे. यंदा ४५ लाख ७३ हजार टन इतके उत्पादन अपेक्षित असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ६६ लाख ५ हजार टन इतके झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २१ लाख टनांनी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत यंदाचे उत्पादन केवळ ६ टक्क्यांनी घटणार आहे. कापसाचे क्षेत्र ४२ लाख २२ हजार हेक्टर इतके असून उत्पादन ७५ लाख ७३ हजार गाठी होण्याची शक्यता असून गेल्या वर्षी हेच उत्पादन ८४ लाख १३ हजार गाठी झाल्या होत्या. सरासरीच्या तुलनेत कापसाचे उत्पादन चार टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
यांना मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले. त्यातच ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडला. याच काळात अनेक पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याने पावसाच्या खंडामुळे उत्पादकता व उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. - विनय आवटे, सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग, पुणे