मुलांचे प्रमाण घटले; मुलींचे प्रमाण वाढले, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे हरवलेल्या २४६ मुलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:42 AM2024-12-10T11:42:57+5:302024-12-10T11:43:43+5:30
घर सोडून पळून आलेल्या आणि घरवापसी करण्यात आलेल्या मुलांमध्ये मुंबई विभाग आघाडीवर
पुणे : रेल्वेस्थानकावर कोणत्या तरी वादामुळे, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आलेल्या मुलांचा शोध आरपीएफ जवानांकडून घेतला जातो. हे प्रशिक्षित कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यासाठी समुपदेशन देतात. अशा पळून आलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी रेल्वेकडून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत अशा मुलांची पुन्हा त्यांच्या घरी पाठविले जाते. गेल्या ११ महिन्यांत पुणे विभागात २११ मुले आणि ३५ मुली अशा २४६ मुलांची घरवापसी करण्यात आली आहे.
रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ आणि रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने एकूण १०९९ मुलांची (७४० मुले आणि ३५९ मुली) सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले आहे. यामध्ये ‘चाइल्डलाइन’सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.
अशी आहे आकडेवारी...
पुणे विभाग - २४६ मुले (२११ मुलगे आणि ३५ मुली)
मुंबई विभाग - ३७९ मुले (२४२ मुलगे आणि १३७ मुली)
भुसावळ मंडळ - २४७ मुले (१४१ मुलगे व १०६ मुली)
नागपूर विभाग - १६८ मुले (१०७ मुलगे व ६१ मुली)
सोलापूर मंडळ - ५९ मुले (३९ मुलगे व २० मुली)
मुंबई विभागात सर्वांत जास्त...
घर सोडून पळून आलेल्या आणि घरवापसी करण्यात आलेल्या मुलांमध्ये मुंबई विभाग आघाडीवर आहे. त्यानंतर भुसावळ आणि पुणे विभागाचा क्रमांक आहे. यावरून घर सोडून पुण्यात पळून येणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हा चिंतेचा विषय आहे.
मुलींचे प्रमाण वाढले...
जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या १०५३ (७४१ मुलगे आणि ३१२ मुली) होती. तर जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या काळात सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या १०९९ मुलांची (७४० मुले आणि ३५९ मुली) आहे. यंदा मुलींचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा वाढले आहे.