रक्षकच बनला भक्षक..! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 20:32 IST2024-12-26T20:31:10+5:302024-12-26T20:32:47+5:30
पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला.

रक्षकच बनला भक्षक..! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अत्याचार
पुणे - विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटना जाणून घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला. यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये FIR क्र. ३५३/२०२४ नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची तत्काळ गांभीर्याने दखल घेत उपसभापती, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना घटनेतील आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत उचित कार्यवाही करावी. आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची दक्षता घेण्याचे सूचित केले. या प्रकरणात शासनाद्वारे योग्य कायदेशीर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचप्रकारे, पीडित मुलीच्या पालकांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करत धैर्य दिले.