राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:53 IST2025-03-04T10:51:44+5:302025-03-04T10:53:08+5:30
पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या आहेत, राजकारणी आणि अधिकारीदेखील खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत

राजकारणी, अधिकाऱ्यांच्या विधानाने तरुणीवर मानसिक परिणाम; चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत - असीम सरोदे
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये सोशल मीडियासह सार्वजनिकरीत्या केली जात आहेत. त्या विधानांचा पीडितेवर मानसिक परिणाम होत आहे. त्यामुळे पीडितेचे चारित्र्यहनन रोखण्यासाठी न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, असा अर्ज ॲड. असीम सरोदे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जातच पीडितेच्या वतीने वकीलपत्र सादर करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला तब्बल ७२ तासांनी पोलिसांनी त्याच्याच गावात पकडून न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने हे घडले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आरोपीच्या आणखी एका वकिलाने त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचे विधान केल्याने सर्वत्र खळबळ उडाली हाेती. या विधानानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट टाकल्या जाऊ लागल्या. राजकारणी आणि अधिकारीदेखील पीडितेबद्दल खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ॲड. असीम सरोदे यांनी पीडितेचे चारित्र्यहनन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, असा अर्ज न्यायालयात केला आहे.
वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. परंतु काही राजकारणी, अधिकारी आदी काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरवत आहेत. न्याय मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या पीडितेचे चारित्र्यहनन केले जात आहे. - ॲड. असीम सरोदे