गद्दारांना जनता जागा दाखवेल; हे सरकार एक महिन्यात पडणार - अदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:25 AM2022-08-03T10:25:25+5:302022-08-03T10:25:32+5:30
मला जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे
पुणे : या राज्यात दोन लोकांचे जम्बो सरकार आहे. पुण्यातील एक गद्दार त्यांच्या मागे मंत्री बनण्यासाठी फिरत आहे. हे बंड वगैरे काही नाही, निव्वळ गद्दारीच आहे. हे सरकार एक महिन्यात पडणार असून गद्दारांना जनता जागा दाखवेल, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद निष्ठा यात्रा सुरू केली. त्यानिमित्ताने मंगळवारी कात्रज चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिला मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधताना त्यांना तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहात का अशी भावनिक आवाहन केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी वयाचे भान ठेवून बोलत आहे. मी माझ्या मनातील बोललो नाही. आक्रमक झालो नाही. कोणाविषयीही माझ्या मनात राग किंवा द्वेष नाही. आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पुढे जात असताना या १२ खासदार व ४० प्लस १० आमदार यांनी राज्याच्या जनतेशी गद्दारी केली, त्यांच्यावर काही दडपण होते ना आनंदात जा, जनतला याची जाणीव आहे. तुम्ही भगव्या झेंड्याशी गद्दारी केली. माणुसकीशी गद्दारी केली. ते म्हणतात, आम्ही बंड केले आहे. बंड करणारे सुरतला गोवाहाटीला पळून गेले. ज्यावेळी हे हॉटेलमध्ये मजा मारत होते. आसाममधील जनता पुरात अडकलेली होती. हे खरे शिवसैनिक असते तर मदतीला धावून गेले असते. मला जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे. त्यामुळे मी या शिवसंवाद निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यपालांवर टीका
आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी वयाच्या ५ वर्षाचा असल्यापासून राजभवनात जात आहे. अगोदर त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनुदार काढले. त्यानंतर आपल्या शिवरायांविषयी बोलले. आता त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, माजी मंत्री शशिकांत सुतार, रघुनाथ कुचिक, आदित्य शिरोडकर, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांची भाषणे झाली.